Friday, July 19, 2013

गुरुपौर्णिमेच्या निमित्याने !!!


साधारणपणे सहा ते सात वर्षांचा असेन मी त्यावेळेला, दापोलीला पोष्टाच्या गल्लीमध्ये आम्ही रहात होतो. पोस्ट ऑफिस समोरच्या घरी (मला वाटत देपोलकारांची चाळ असावी ती) पहिल्या मजल्यावर कॉलेज मधल्या मुलांच्या नाटकाची तालीम चालू होती. 'प्रेम तुझा रंग कसा', हे नाटक असाव अस आठवतंय आणि या नाटकाचे दिग्दर्शक होते पेंडसे सर. मी खूप वेळा या तालमी बघायला जात असे आणि त्या नाटकामध्ये बुडून जात असे. त्यावेळी प्रत्येक संवादाचा आणि त्यामागील लेखकाच्या भूमिकेचा अन्वयार्थ तळमळीने समजावणारे सर मला अजूनही आठवतात. वय लहान होत त्यामुळे तपशील काही आठवत नाही पण नाटक बसवण ही एक खूपच छान गोष्ट आहे हे मात्र नक्की कळल. अर्थात नंतर अगदी भरताच्या नाट्यशास्त्रापासून नाटक कसे वाचावे, पाहावे या सार्याचा अगदी सखोल अभ्यास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करायला मिळाला. पेंडसे सरांची आणि माझी ही खऱ्या अर्थान झालेली पहिली भेट. 

खर तर कला शाखेकडे मी थोडा मनाविरुद्धच प्रवेश घेतला होता, मला व्हायचे होते इंजिनिअर पण नशिबाचे फासे असे काही विचित्र पडले आणि बारावी सायन्सच्या परीक्षेत मी गटांगळ्या खाल्ल्या. यानंतर मी अतीव निराशेने बारावी कला शाखेला प्रवेश घेतला आणि त्यानंतर वर्षभरातच मराठीचे शिक्षक म्हणून मला सर शिकवायला आले. त्यानंतरच्या साधारणपणे दोन महीन्यातच त्यांनी माझा कला शाखेकडे आणि मराठी साहित्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. 

मराठी साहित्य हा केवळ एक बी. ए. ला असणारा एक विषयच नसून तो एक जीवन समृद्ध करणारा एक अतिशय व्यापक अनुभव आहे याचा प्रत्यय त्यांच्या शिकवण्यातून सरांनी सतत आम्हाला दिला. त्यानंतरची साधारणपणे तीन वर्षे म्हणजे आमच्यासाठी अक्षरश: ड्रीम रन होती. एका मागोमाग एक वेगवेगळे साहित्य प्रकार म्हणजेच लघु कथा, कथा, कविता, एकांकिका, दीर्घांक, नाटक, कादंबरी, आत्मचरित्र, समीक्षा या साऱ्यांमुळे आमच अनुभव विश्व समृद्ध होत गेल. मला आठवतंय त्या काळात फावल्या वेळात ( आणि आर्टस च्या मुलांना हा वेळ तसा बराच मिळतो) मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पाठक सरांना मदत करायला जायला सुरवात केली आणि त्यामुळे मला असंख्य प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. सरांनी एखाद पुस्तक सुचवायचं, मी ते मिळवून अधाशासारख संपवायचं आणि मग सरांशी त्या पुस्तकाबद्दल गप्पा मारायच्या असा तो सगळा रमणीय अनुभव होता. तशी मला वाचनाची आवड खूप लहानपणा पासूनच होती पण त्या वाचनाला दर्जा आणि उंची मिळाली ती सरांमुळेच. एखादी कलाकृती वाचावी कशी किवा त्याही पुढे जाऊन अनुभवावी कशी हे आम्ही सरांकडून शिकलो. जी कलाकृती उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न निर्माण करते, वाचकाला आनंदी करण्यापेक्षा अस्वस्थ करते ती खरी कलाकृती हे सरांचे विवेचन नंतरच्या आयुष्यामध्ये पुरेपूर पटले.  साहित्यातील जगप्रसिद्ध वादाचा म्हणजे 'जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन', आशय सरांकडून समजून घ्यायचा प्रयत्न केला. 

आनंद यादवांची 'गोतावळा', ही कादंबरी, गौरी देशपांडे यांनी लिहिलेली 'एक एक पान गळावया', ही कादंबरी, लक्षण मानेंच 'उपरा', लक्ष्मी बाई टिळकांची 'स्मृतीचित्रे', विजय तेंडुलकरांच 'कमला', हे नाटक आणि या सारख्या असंख्य अभ्यासक्रमा बाहेरील कलाकृती सरांनी अतिशय तळमळीने आम्हाला शिकवल्या. गोतावळा मधील यंत्र संस्कृतीचे मानवावरील आक्रमण, एक एक पान मधील मुक्त होऊ पाहणारी नव्या जगातील स्वतंत्र स्त्री, कमला मधील सोनेरी पिंजरा तोडण्याच धाडस दाखवणारी आणि पत्रकार असणाऱ्या नवऱ्याच सुप्त शोषण उघड करणारी नायिका या सगळयांची सरांनी अगदी जवळून ओळख करून दिली. आज जगताना त्यावेळी नीटसे न उमजलेले  संदर्भ जेव्हा समजतात तेव्हा सरांच्या सशक्त शिकवण्याची पुन्हा एकदा जाणीव होते. सरांनी नुसता मराठी विषयच शिकवला नाही तर जगायचं कस या एक मोठ्या अभ्यासक्रमाची एक सुरेख सुरवातच करून दिली अस आज वाटत.    

सरांनी कधीही निव्वळ परीक्षार्थी तयार करण्यामध्ये धन्यता मानली नाही, त्यांना सतत चांगले जीवनार्थी तयार करण्याचा ध्यास होता. साहित्याची आवड केवळ परीक्षा पास होण्यासाठीच नाही तर त्यानंतरचे अख्खे जीवन समृध्द करण्यासाठी खूपच महत्वाची आहे हे त्यांनी जाणले होते आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते परीक्षेपुरतीच नव्हे तर कायम स्वरूपी पुरेल अशी रसद देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. 

माझ्यापुरता त्यांचा हा प्रयास चांगलाच यशस्वी झाला असा म्हणायला आता हरकत नाही. त्यांनी माझ्यामध्ये ज्ञानलालसेची अशी काही बीजे पेरली आणि साहित्याच्या अभ्यासामधून असा काही आत्मविश्वास मला मिळवून दिला की कॉलेज संपल्यावर मी फक्त कला शाखेचा पदवीधर आहे असा न्यूनगंड मला कधीच वाटला नाही. सैद्धांतिक पातळीवर जीवनाची बैठक सरांमुळे इतकी पक्की बसली होती की नंतरच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत संघर्षाच्या काळात माझा कधीच अर्जुन झाला नाही. आजही लौकिकार्थाने मी काही खूप यशस्वी वगैरे नाही पण समाधानी मात्र नक्कीच आहे. कामाच्या धबडग्यात आज काल वाचणही फारस होत नाही पण आत कुठेतरी निर्माण झालेलं स्फुल्लिंग स्वस्थ बसू देत नाही. सतत नवीन काहीतरी सुचत असत आणि या माझ्यामधील नवनवीन करण्याची क्षमता निर्माण करण्याच श्रेय मी निश्चितच सरांना देईन.

सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेछा, आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की सरांनी काहीतरी लिहाव आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करत रहाव आणि त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून सतत कार्यरत रहाव.   

No comments:

Post a Comment